सध्याच्या काळामध्ये जेव्हा समाजातील लोकं विविध लैंगिक प्रवृत्तींचे उदा. समलैंगिक, उभयलिंगी, इंटरसेक्स, ट्रान्सजेंडर, अलैंगिक इत्यादीअसताना स्त्रीत्वाचा फक्त स्त्रीच्या शारिरीक रचनेसोबत संबंध जोडून विचार करणे चुकीचे आणि संकोचित विचारसरणीचे प्रतीक वाटते. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास ही बाब स्पष्ट आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रोजेस्टेराॅन आणि टेस्टाॅस्टेराॅन असे दोन्ही हाॅर्मोन असतात यावरून प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्रीत्वाची भावना असतेच हे समजून येते. स्त्रीत्व हे फक्त शरीररचनेने स्त्री असणार्यांचा गुणधर्म नसून ते नैसर्गिकरित्या कमी अथवा जास्त प्रमाणात सर्वांमध्ये आढळून येते. परंतू दुःखाची बाब ही आहे की स्त्रियांसोबतच स्त्रियांसारखे गुणधर्म असलेल्या पुरूषांना आणि किन्नर समाजातील लोकांना समाजात किंवा कामाच्या ठिकाणी विविध लैंगिकशोषण आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. पारंपारिक व पुरातन विचारसणीच्या सामाजिक रचनेमुळे त्यांच्यावरील या अत्याचाराला वाच्या फोडणे कठीण होत आहे. परंतू असल्या अमानवी कृत्यांना घाला घालणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाना लैंगिकता आणि लिंग या दोन्हीमध्ये फरक आहे हे समजणे गरजेचे आहे. शेवटी प्रत्येक व्यक्तीला त्याचे आयुष्य त्याच्या आवडीने जगण्याचा अधिकार आहे.
सद्यस्थितीत स्त्रियांवरील लैंगिक आणि मानसिक अत्याचारांसोबत आर्थिक विषमतेचा दर पण वाढला आहे. अनेक नोकरी/व्यवसाय/उद्योगधंद्यामध्ये आजही स्त्रियांना दुय्यम वागणूक आणि समान कामासाठी पुरूष सहकार्यांपेक्षा कमी वेतन दिले जाते. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून समान कामासाठी समान वेतन या कायद्याचे चोखपणे पालन करणे आवश्यक आहे. जागतिक महिला दिन हा फक्त स्त्रियांचा गुणगौरव करण्याचा दिवस नसून विविध स्थरांवरील लोकांनी स्त्रियांचे तसेच स्त्री नसून स्त्रीत्वाची भावना असणार्या लोकांचे प्रश्न समजून त्यावर समाधानकारक तोगडा काढण्याची संधी आहे.
खर पाहता स्त्रीत्वाचा उत्सव वर्षातून फक्त एक दिवस साजरा न करता वर्षभर साजरा केला पाहिजे. या जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर चला सर्वांमधील स्त्रीत्व साजरे करू!
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Author: Apurva Paithane