मूकनायक – समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी, द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन, पुणे, २०१८ (वर्ष पाहिले) हे मराठीतील पाहिले साहित्य संमेलन रविवारी २५नोव्हेंबर, २०१८ रोजी ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी १० वा. ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत पार पडले. या संमेलन मध्ये अनेक वेगवेगळ्या कलाकारांनी त्यांच्या कलाकृती सादर केल्या. या संमेलनाचे आयोजन समपथिक ट्रस्ट, पुणे यांनी केले होते. या संमेलनासाठी अनेक मान्यवर आणि प्रेक्षकांची उपस्थिती होती. मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या भागातून प्रेक्षक मंडळींनी या संमेलनासाठी उपस्थिती दाखविली. अभिवाचन, नाट्यसादरीकरण, पहिल्या समलिंगी विवाह केलेल्या व्यक्तीच्या लेखनाचे अभिवाचन, ई- साहित्य, कवितांवर चर्चा, कवितावाचन, इतर समाज सेवा करणाऱ्या संस्थांची माहिती अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन या संमेलनात केले होते आणि प्रेक्षकानी त्यास उत्तम प्रतिसाद दिला.
ह्रिषिकेश साठवणे यांनी लिहिलेल्या ‘यवतमाळ चा पहिला समलिंगी विवाह’ याचे वाचन सौरभ बोंद्रे याने केले तर जमीर कांबळे यांनी त्यांच्या नाटक क्षेत्रातील आजपर्यंत आलेल्या अनुभवांचे कथन केले त्याचप्रमाणे, परीक्षित शेटे यांनी ‘जास्वंद’ या एकपात्री नाटकातील काही भाग सादर करून दाखवला, सुरेश खोले व पुष्कर एकबोटे यांनी मराठी विकिपीडीयाची माहिती दिली, दिशा शेख आणि सारंग पुणेकर या तृतीयपंथी कवयित्रींनी त्यांच्या कविता सादर केल्या, बिंदुमाधव खिरे यांनी स्वलिखित पार्टनर या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले, चिन्मय संत व रितेश तिवारी या कलाकारांनी प्रमोद काळे लिखित ‘न येति उत्तरे’ या नाटकाचे नाट्य वाचन केले.