एलजीबीटी समुदाय एक समाज दुर्लक्षित विषय. या समुदायातील अनेक व्यक्तींच्या कथा, पुस्तकं, चित्रपट, मालिका पाहिल्या असतील किंवा बघायला मिळतील. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. संपूर्ण जगभरात अनेक संस्था, व्यक्ती या समाजासाठी, त्यांच्या हक्कासाठी कार्यरत आहेत. भारतातही अशा अनेक संस्था आहेत. या समाजाबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. उदा; एलजीबीटी अभिमान मोर्चा, चित्रपट महोत्सव, नाटकं, पथनाट्य, देशविदेशातील वेगवेगळ्या परिषद, पुस्तकं इत्यादी. तसे पाहता या समाजबद्दलचा दृष्टीकोन आजच्या पिढीचा बऱ्यापैकी बदलला आहे. अनेक व्यक्ती स्वतःला स्वीकारून अभिमानाने जीवन जगतात, समाजाकडून या समुदायाचा स्वीकार होत आहे जी चांगली गोष्ट आहे.
परंतु या सगळ्या गोष्टी मोठ्या शहरांमध्ये जास्त होत आहेत. अजूनही छोट्या गावांमध्ये या विषयाबद्दल अज्ञान आहे. तेथील लोकांपर्यंत या गोष्टी न पोहोचण्याचे एक कारण असू शकते ते म्हणजे भाषा.
उदा. १. चित्रपट महोत्सव हे जास्त करून मोठ्या शहरांमध्ये होतात. याबद्दल खेडेगावातील लोकांना काहीच माहीत होतं नाही कारण याची प्रसिद्धी ही इंग्रजी भाषेतून केलेली असते आणि जरी माहीत पडलं आणि ते इथे उपस्थित राहिले तरी प्रादेशिक भाषेतील चित्रपट खूप कमी असतात आणि त्यातील काही चित्रपट हे त्यांच्या डोक्यावरून जातात कारण या समाजाबद्दल असलेले अज्ञान.
२. येथील समाजसेवक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, परदेशात परिषद भरवतात पण कधी कधी हे समजत नाही की जिथे आधीच या समाजाबद्दल खूप चांगल्या प्रकारे समाजप्रबोधन होत आहे, स्वीकार आहे तिथे परिषद भरवुन आणि मोठी मोठी भाषणं केल्याने छोट्या गावातील एलजीबीटी समाजाला त्याचा काय उपयोग होणार आहे.
३. पुस्तकं – या विषयांवर अनेक पुस्तकं आहेत पण प्रादेशिक भाषेंमधून अगदी बोटावर मोजण्याइतके.
एलजीबीटी या समाजाबद्दल अनेक ठिकाणी बोललं जातं, वेगवेगळ्या प्रकारे समाजप्रबोधन केलं जात पण याच समाजाचा एक हिस्सा म्हणजे “इंटरसेक्स” विषयी खूप कमी माहिती मिळते. कारण सर्वात प्रथम असाही एक समाज आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे आणि माहीत असेल तरी तो समजण्यासाठी खूप अभ्यास लागतो. इंटरसेक्स वर काही पुस्तकं आहेत पण तीही इंग्रजी मधून.
हा विषय समाजाला कळवा व अशा व्यक्तींचं वेगळेपण समाजाने स्वीकारावे, त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, त्यांना मानाने व इज्जतीने जगता यावे आणि या विषयाबद्दलची माहिती तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचावी या हेतूने पुण्यातील बिंदुमाधव खिरे यांनी “इंटरसेक्स एक प्राथमिक ओळख” हे पुस्तक मराठीतून आणि सोप्या भाषेत आणि वाक्यरचनेत लिहिले आहे. माझ्यामते मराठीतून या विषयावर भारतातील हे पहिले पुस्तक असेल तसेच याच पुस्तकावरून खिरे यांनी “जास्वंद” हे इंटरसेक्स विषयावर मराठीतून नाटक लिहिले आहे.
हे पुस्तक इंटरसेक्स व जननेंद्रियांच्या इतर काही वेगळेपणाची प्राथमिक माहिती देतं. जसे जननेंद्रिय कशी घडतात?, जननेंद्रिये घडताना वेगळेपण कसं येतं?, इंटरसेक्स व्यक्तींच्या समस्या आणि त्यांच्याबद्दल कायदा काय म्हणतो? इत्यादी प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं या पुस्तकात दिली आहेत.
इंटरसेक्स विषयाबद्दल समाजात आणि विशेषतः छोट्या गावांमध्ये खूप अज्ञान आहे. जिथे अज्ञान आहे तिथे अंधश्रद्धा व असहिष्णुता वृत्ती आलीच. साहजिक आहे, की अशा व्यक्तींना आपली लैंगिक ओळख लपवून ठेवावी लागते. आयुष्यभर आपल्यातील वेगळेपण लपवाव लागतं, कारण जर ते समाजासमोर आलं तर त्यांची थट्टा होते, त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे या विषयांवर प्रादेशिक भाषेत काम होणं अत्यंत गरजेचे आहे.
पुस्तक – “इंटरसेक्स – एक प्राथमिक ओळख”
लेखक – बिंदुमाधव खिरे
भाषा – मराठी
पुस्तक मिळण्याचे ठिकाण : समपथीक ट्रस्ट, १००४, बुधवार पेठ, विजय मारुती चौक पुणे, ४११००२
ई-मेल – samapathik@hotmail.com
किंमत : रु. १२५/-